बजेटचा राजकीय फायदा उठवण्याचा विचार नाही
By admin | Published: January 31, 2017 12:22 AM2017-01-31T00:22:35+5:302017-01-31T00:22:35+5:30
पाच राज्यातील निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करून, केंद्रातील भाजपा सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला. अर्थसंकल्पाद्वारे
नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करून, केंद्रातील भाजपा सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला. अर्थसंकल्पाद्वारे सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याचे आरोप खरे नाहीत, असे सरकारने म्हटले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. त्याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुकीच्या काळातील मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी काम करण्याची गरज आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने जाहीर केला आहे.
आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेनेही बहिष्कार घातला होता. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये. सीबीआयचा दुरुपयोग करुन आपल्या पक्षाच्या एका खासदाराला अटक केल्याचा आरोप करत हा मुद्दा आगामी अधिवेशनात मांडणार असल्याचे तृणमूलने स्पष्ट केले आहे.
या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी सर्व पक्षांना सहकार्य मागितले आहे. निवडणूक काळात आमच्यात काही मतभेद होऊ शकतात. पण, संसद महापंचायत आहे. येथे सर्वांनी मिळूून काम करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पुन्हा नोटाबंदीचा मुद्दा
नोटाबंदीचा मुद्दा पुन्हा मांडणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. याच मुद्यावरुन गत अधिवेशनात कामकाज होऊ शकले नव्हते. काँग्रेस आणि माकपच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांनी या सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले की, नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चा व्हायला हवी. नोटाबंदीला कडाडून विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने बैठकीला हजेरी लावली नाही.
- बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये.