हा तर श्रीमंतांनी श्रीमंतांसाठी केलेला श्रीमंतांचा अर्थसंकल्प- पी. चिदम्बरम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:05 AM2021-02-12T05:05:31+5:302021-02-12T05:05:53+5:30
राज्यसभेत केंद्र सरकारवर टीकास्त्र
नवी दिल्ली : मोदी सरकारने यंदा केवळ श्रीमंतांसाठी अर्थसंकल्प तयार केला असून, त्यातून गरिबांच्या वाट्याला काहीच आलेले नाही. त्यामुळे ‘श्रीमंतांनी श्रीमंतांसाठी केलेला श्रीमंतांचा अर्थसंकल्प’ असेच याचे वर्णन करावे लागेल, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, देशातील केवळ एक टक्का श्रीमंतांसाठीच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. या एक टक्का लोकांकडे देशातील ७३ टक्के संपत्ती आहे. आर्थिक गैरव्यवस्थापनाचा हा अर्थसंकल्प म्हणजे नमुनाच असून, त्यातून सरकारची अकार्यक्षमताच दिसून आली आहे. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी काहीच नाही, असा आरोप करून चिदम्बरम म्हणाले की, अकार्यक्षम या माझ्या शब्दप्रयोगाला अर्थमंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. पण, या अर्थसंकल्पाचे स्वरूप पाहता, मी वापरलेला शब्द अतिशय सौम्यच आहे. गेली तीन वर्षे सतत आपण आर्थिक गैरव्यवस्थापन पाहत आहोत.