३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:53 IST2025-01-28T14:52:01+5:302025-01-28T14:53:46+5:30
Budget Session 2025 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार
नवी दिल्ली : संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.
अधिसुचनेनुसार, १८ व्या लोकसभेचे चौथे अधिवेशन ३१ जानेवारी २०२५ रोजी सुरू होईल. तर सरकारी कामकाज ४ एप्रिल २०२५ रोजी संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दोन भाग असणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग ३१ जानेवारीला सुरू होईल आणि १३ फेब्रुवारीला संपणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग १० मार्चला पासून सुरू होईल आणि ४ एप्रिलला संपणार आहे.
३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात एकूण ९ बैठका होणार आहेत. यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतील. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील. यानंतर,संसदेचे कामकाज अर्थसंकल्पीय प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी सुरू होईल. त्यानंतर विविध मंत्रालयांकडून अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आणि अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संसदेची दुसऱ्या भागात १० मार्चपासून पुन्हा बैठक होईल.
Delhi | President Droupadi Murmu will address both Houses of Parliament on Friday, 31st January 2025
— ANI (@ANI) January 28, 2025
First part of the Budget session of the Parliament to begin on 31st January 2025 and conclude on 13th February. Second part of the session to commence on 10th March 2025 and… pic.twitter.com/Q4lVlMAbi0
३० जानेवारीला होणार सर्वपक्षीय बैठक
संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ बैठका होतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठक बोलावली जाईल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात सुरळीत चर्चा होण्यासाठी किरण रिजिजू यांनी विरोधी पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक चांगला आणि संतुलित अर्थसंकल्प सादर करतील, अशी आशा केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी व्यक्त केली आहे.