संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; दुकानांवरील नावे, नीटचे मुद्दे ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:26 AM2024-07-22T05:26:29+5:302024-07-22T05:26:45+5:30
संसद सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रा मार्गावर भोजनालयांना मालकाचे नाव लिहिण्याचे दिलेले आदेश आणि नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यांवर चर्चेची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करीत विरोधकांनी आपल्या रणनीतीचे संकेत दिले.
संसद सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्यांनी सांगितले. आपचे संजय सिंह यांनी सीबीआय व ईडीच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला. डीएमकेच्या तिरुची सिवा यांनी नीटच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली.
मागील अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला पंतप्रधान मोदी उत्तर देताना विरोधकांनी व्यत्यय आणला त्याची आठवण करून देत राजनाथ सिंह आणि रिजिजू यांनी असे व्यत्यय येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सीतारामन ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर
■ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत.
■ सलग सातवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर नोंदवला जाईल.
■ यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सहावेळा अर्थसंकल्प मांडला होता.
■ सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प मांडून एक वेगळा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवणार आहेत.
बिहार, आंध्रला विशेष दर्जा देण्याची मागणी :
जनता दल (युनायटेड) आणि वायएसआर काँग्रेसने अनुक्रमे बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. पण तेलुगू देसमने याबाबत मौन बाळगले.