अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून : ‘तलाक’ विधेयकासाठी मोदी सरकारची व्यूहरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:26 AM2018-01-29T02:26:34+5:302018-01-29T02:26:42+5:30
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरूहोत असून, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार एकीकडे व्यूहरचना आखत असताना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.
नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरूहोत असून, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार एकीकडे व्यूहरचना आखत असताना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रस्तावित विधेयकांवर चर्चा करण्यासाठी रविवारी सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. यानंतर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार म्हणाले, या अधिवेशनात ट्रिपल तलाकबाबतचे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सर्वसंमतीसाठी विविध पक्षांशी चर्चा करणार आहोत. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
९ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर ५ मार्च रोजी अधिवेशनाच्या दुसºया टप्प्याला प्रारंभ होईल. हे अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालेल.
विरोधक विचारणार जाब '
या अधिवेशनात ट्रिपल तलाकसंबंधी विधेयकासोबतच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतचे विधेयक मंजूर करून घेण्याची सरकारची इच्छा आहे, तर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, घटनात्मक संस्थांमधील कथित वाद आणि जीएसटी व व्यावसायिकांची परिस्थिती, शेतकºयांचे प्रश्न यांसारख्या विषयांवर विरोधक सरकारला जाब विचारूइच्छितात.
काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, देशासमोरील अनेक समस्या, विषय यावर आम्ही चर्चा करू इच्छितो. सरकारने सहकार्याची भूमिका घ्यावी. देशाशी संबंधित महत्त्वाचे विषय विरोधकांना मांडू द्यावेत.
सर्वपक्षीय नेते हजर
केंद्र सरकारकडून बोलविण्यात आलेली ही बैठक दुपारी ४ वाजता सुरूझाली आणि दोन तास चालली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, सपाचे मुलायम सिंह, भाकपचे नेते डी. राजा, तृृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंदोपाध्याय, द्रमुकच्या कनीमोळी आदींनी सहभाग घेतला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती.