इमारत पेटली, नऊ जण ठार; हैदराबादमधील घटना, फटाक्यांमुळे आग लागल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:25 AM2023-11-14T08:25:30+5:302023-11-14T08:25:41+5:30
इमारत पाच मजली असून इतर मजल्यांमध्ये प्रचंड धूर पसरला. त्यामुळे श्वास काेडून ४ महिलांचा मृत्यू झाला.
हैदराबाद : शहरातील नामपल्ली या मध्यवर्ती भागातील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली. त्यात लहान मुले आणि महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास तळमजल्यावर आग लागली. या ठिकाणी ज्वलनशील रसायनांनी भरलेले ड्रम हाेते. काही मिनिटांमध्येच आगीने राैद्र रुप धारण केले आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत ज्वाळा पाेहाेचल्या. इमारत पाच मजली असून इतर मजल्यांमध्ये प्रचंड धूर पसरला. त्यामुळे श्वास काेडून ४ महिलांचा मृत्यू झाला.
२१ जणांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेऊन अनेक मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई साैंदरराजन यांनी घटनेच्या सखाेल चाैकशीचे तसेच अशा घटनांवेळी प्रतिसादाची यंत्रणा, आवश्यक उपाययाेजनासंदर्भात दाेन दिवसांत अहवाल देण्याचे आदेशही दिले.
आग कशी लागली?
काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास लहान मुले फटाके फाेडत हाेती. फटक्यांची ठिणगी ड्रमवर पडली आणि आग लागली. ज्वलनशील रसायनांनी ड्रम भरले हाेते. त्यामुळे आग काही क्षणातच भडकली.
इमारतीत हाेती १६ कुटुंबे
१६ कुटुंबे इमारतीत राहत हाेते. त्यापैकी दाेन कुटुंबांमधील लाेकांचा मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील ७ जणांचा समावेश आहे.