मध्य प्रदेशात इमारत कोसळून ८ जण ठार
By admin | Published: August 21, 2016 03:37 AM2016-08-21T03:37:45+5:302016-08-21T03:37:45+5:30
मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी दोन इमारती कोसळून आठ जण मृत्युमुखी पडले. सागर आणि सतना या दोन जिल्ह्यात या दुर्घटना घडल्या.
मैहर : मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी दोन इमारती कोसळून आठ जण मृत्युमुखी पडले. सागर आणि सतना या दोन जिल्ह्यात या दुर्घटना घडल्या.
सागर जिल्ह्याच्या राहतगड भागात शनिवारी पहाटे कच्चे घर कोसळून सात ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मेहताब यांचे हे घर होते. या दुर्घटनेत घरातील सात जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला, तर घरमालक मेहताब (५९) व त्यांची दोन मुले लखन (२६) आणि महेंद्र (२३) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घर कोसळले, तेव्हा घरातील लोक गाढ झोपेत होते. जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक अग्रवाल यांनी दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेहताब यांची पत्नी मोनाराणी (५५), दोन मुलगे विकास (१८) आणि नितीन (१४), मुलगी संजना (११) यांच्याशिवाय कल्लू (३०), त्याची पत्नी माया (२५) आणि या दाम्पत्याची मुलगी तमन्ना (१८ महिने) यांचा मृतांत समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.
सरकारी इमारत जमीनदोस्त
सतना जिल्ह्यात नवी बहुमजली इमारत कोसळून एक महिला ठार तर सात जण जखमी झाले. मैहर भागातील ही तीन मजली निवासी व व्यवसायिक इमारत मध्य प्रदेश गृहनिर्माण विभागाने बांधली होती. या दुर्घटनेत एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली आणखी नऊ ते १२ लोक अडकले असून, त्यांना वाचविण्यासाठी मदत व बचावकार्य सुरू आहे, असे जिल्हाधिकारी नरेश पाल यांनी सांगितले.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निकृष्ठ बांधकाम साहित्य वापरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २०१३-१४ मध्ये बांधलेल्या तळमजल्यावर २२ दुकाने आणि २०१४-१५ मध्ये बांधण्यात आलेल्या पहिला आणि दुसऱ्या मजल्यावर २० सदनिका होत्या. या इमारतीमध्ये दोन तीन दिवसांपासून पाणी घुसले होते.