उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:49 PM2024-09-07T19:49:18+5:302024-09-07T19:54:40+5:30
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखालून २८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.
Lucknow Building Collapses :उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मोठा अपघात घडला. लखनऊच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील एक इमारत अचानक कोसळली. पिलरवर बांधकाम सुरू असलेली इमारत पडताच केवळ ढिगाराच उरला. या इमारतीत अनेक औषधी कंपन्यांची गोदामे असल्याचे माहिती समोर आली आहे. अपघातावेळी या गोदामात अनेक कामगार उपस्थित होते आणि ते ढिगाऱ्याखाली दबले गेले आहत. त्यामुळे प्रशासनाकडून मदत बचाव कार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत २८ लोकांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये शनिवारी ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या अपघातात इमारतीजवळ उभ्या असलेला ट्रकही ढिगाऱ्याखाली गाडली गेला. इमारत कोसळल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली होती. अद्यापही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पोलीस दल आणि इतर मदत पथक घटनास्थळी पोहोचले असून इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत.
हरमिलाप टॉवर असे कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. ही तीन मजली इमारत असून त्यातील अर्धी इमारत कोसळली आहे. इमारत कोसळल्यानंतर २८ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे ट्रान्सपोर्ट नगरजवळील शहीद पथावर जुनी इमारत कोसळल्याचे म्हटलं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गांभीर्याने घेत तातडीने मदतीच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशासनाचे सर्व अधिकारी तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. आतापर्यंत २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका अद्यापही हजर आहेत. आत अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि बचावासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफला पाठवले. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या. जखमींवर उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.