बुलंदशहर : गोळीबार करणाऱ्या जवानाचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 04:28 AM2018-12-08T04:28:38+5:302018-12-08T04:28:40+5:30
गोहत्या केल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात झालेल्या हिंसाचारात गोळीबार करणा-या जितू नावाच्या लष्करी जवानाचा पोलीस शोध घेत आहेत.
लखनौ : गोहत्या केल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात झालेल्या हिंसाचारात गोळीबार करणा-या जितू नावाच्या लष्करी जवानाचा पोलीस शोध घेत आहेत. तो जम्मूत असल्याची माहिती मिळताच, त्याच्या शोधासाठी पोलीस तिथे गेले आहेत. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व एक जण ठार झाला होता.
या हिंसाचाराच्या काही व्हिडिओ फिती पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. त्या बारकाईने पाहिल्यानंतर त्यात एक लष्करी जवान गोळीबार करीत असल्याचे दिसले होते. त्याचे नाव जितू असून, एफआयआरमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याने झाडलेल्या गोळ्यांनीच सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार या युवकाचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. हा जवान बुलंदशहर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे.
हिंसाचारानंतर हा लष्करी जवान तिथून गायब झाला आहे. हा जवान सुट्टी घेऊन गावी परतला होता व त्यानंतर पुन्हा जम्मूमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी हजर झाला, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले; मात्र तो अद्याप रुजू झालेला नसल्याचे लष्करी अधिकाºयांनी पोलिसांना सांगितले आहे. हिंसाचारासंदर्भात हाती लागलेल्या व्हिडिओमधील सर्व आरोपींचा कसून शोध सुरू
आहे. (वृत्तसंस्था)
>दोघांची हत्या एकाच पिस्तुलाने
पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाने झाली आहे. ते ०.३२ बोअर प्रकारातील पिस्तूल असावे, असा कयास आहे. सुबोधकुमार सिंह यांच्याकडे याच प्रकारचे सर्व्हिस पिस्तूल होते.हिंसाचार करणाºयांनी ते पिस्तूल पळविल्याचा संशय आहे. गोहत्या केल्याच्या कारणावरून जमावाने सुमारे तीन तास हिंसाचार चालविला होता. त्यांची पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांशी चकमक झाली. जमावाने वाहने व एक पोलीस चौकीही जाळली.