बुलंदशहर हिंसाचार; मुख्य आरोपी अटकेत; अन्य तिघांचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:21 AM2019-01-04T04:21:21+5:302019-01-04T04:22:05+5:30
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबर रोजी गोरक्षकांनी केलेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात आली आहे.
मेरठ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबर रोजी गोरक्षकांनी केलेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात आली आहे.
या हिंसाचारातपोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व अमित नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. बजरंग दलाने योगेशच्या बाजूने उभे राहत त्याला कायदेशीर मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारानंतर बजरंग दलाचा स्थानिक संयोजक योगेश फरार होता. त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात
आली.
बुधवारी सकाळी हिंसाचारातील आरोपी सतीश, विनीत आणि अन्य एक जण गायीच्या कत्तल प्रकरणातील आरोपी अझहरने बुलंदशहरच्या स्थानिक न्यायालयात आत्मसमर्पण केले. (वृत्तसंस्था)
काय घडली होती घटना?
जमावाच्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह आणि २० वर्षीय सुमितकुमार यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी २७ जणांविरुद्ध आणि ५० ते ६० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
३१ जण अटकेत
या आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या ३१ झाली आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर ५ डिसेंबर रोजी योगेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यात योगेशने आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता.