७ वर्षांत मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार बुलेट ट्रेन
By admin | Published: December 12, 2015 04:11 PM2015-12-12T16:11:22+5:302015-12-12T16:16:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावरील महत्वपूर्ण प्रकल्प असणा-या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आज हिरवा कंदील मिळाल्याने येत्या सात वर्षांत जपान भारताला बुलेट ट्रेन तयार करून देईल.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावरील महत्वपूर्ण प्रकल्प मानल्या जाणा-या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आज हिरवा कंदील मिळाला असून या मार्गावरील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट जपानला देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या करारानुसार येत्या सात वर्षांमध्ये जपान भारताला बुलेट ट्रेन तयार करून देणार आहे.
भारताच्या दौ-यावर आलेले जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी हैदराबाद हाऊस येथे या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यावेळी त्यांच्यादरम्यान अनेक महत्वपूर्ण विषयांवरही चर्चा झाली. बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबई व अहमदाबादमधील प्रवासाचा वेळ सात तासांवरुन अवघ्या दोन तासांवर येईल. बुलेट ट्रेनकरिता ५०५ किलोमीटर लांब मार्ग तयार करण्यासाठी सुमारे ९८ हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे.
दरम्यान बुलेट ट्रेनव्यतिरिक्त दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या अणुकरार व संरक्षण क्षेत्रातील उपकरणांच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानी नागरिकांना येत्या मार्च महिन्यापासून भारतात आगमन झाल्यानंतर व्हिसा देण्याची घोषणाही केली.