बुलेट ट्रेनचे भाडे २५0 ते ३,000 रुपये; ३२० किमी प्रति तास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:57 AM2018-04-15T00:57:09+5:302018-04-15T00:57:09+5:30
मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे.
नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे. ही ट्रेन २०२२ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. संभाव्य भाडेदराचा अंदाज नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिला.
अचल खरे यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे भाडे ३००० रुपये असेल. बिझनेस क्लाससाठी या ट्रेनमध्ये भाडे दर ३,००० रुपयांपेक्षा अधिक असू शकते. बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे भाडे २५० रुपये असेल. या दोन स्टेशनांदरम्यान टॅक्सीचे भाडे ६५० रुपये असून, त्यासाठी वेळ अडीच तास एवढा लागतो. हाय स्पीड ट्रेनने १५ मिनिटांत हे अंतर पार करता येईल.
त्यांनी सांगितले की, एसी प्रथम श्रेणीचे भाडे दीडपट अधिक असेल. एका ट्रेनमध्ये १० डबे असतील. यातील एक बिझनेस क्लासचा असेल. या योजनेनुसार, डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल. कारण तोपर्यंत भूसंपादन होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाला या योजनेसाठी १,४१५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी १० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने भूसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. बाजारभावापेक्षा या जमिनींना २५ टक्के जादा दर दिला जाईल.
४,००० जणांना मिळेल थेट रोजगार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत ३ ते ४ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे, तर ३० ते ४० हजार कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत जपानची अधिक भागीदारी असल्याचे वृत्त फेटाळून लावताना अधिकाºयांनी सांगितले की, त्यांची भागीदारी फक्त १८.६ टक्के आहे. भारतीय कंत्राटदार ४६० किमीचे काम करणार आहेत. जपान समुद्राखालील २१ किमीचे काम करणार आहे.
अपघातांचा नीचांक
रेल्वेसाठी २०१७-१८ हे वर्ष मागील ५७ वर्षांतील सर्वाधिक सुरक्षित वर्ष ठरले आहे. गेल्या वर्षभरात ७३ रेल्वे अपघात झाले. हा अपघातांचा गेल्या ५७ वर्षांतील नीचांक ठरला आहे.
त्या आधीच्या वर्षी १०४ रेल्वे अपघात झाले होेते. २०१७-१८ मध्ये रेल्वेने ४,४०५ किमीच्या रेल्वे मार्गांचे नूतनीकरण केले. हा उच्चांक ठरला आहे. सर्व रेल्वेगाड्यांनी मिळून २०१७-१८ मध्ये १,१७०.७ दशलक्ष ट्रेन कि.मी. प्रवास केला आहे.
रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांब प्रवास आहे. एवढा विक्रमी प्रवास करूनही अपघातांत घसरण झाली आहे.