बुलेट ट्रेन हे श्रीमंतांचे चोचले, ‘मेट्रो मॅन' इ. श्रीधरन यांचे परखड मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:46 PM2018-07-01T23:46:31+5:302018-07-01T23:46:39+5:30
बुलेट ट्रेनचा प्रवास अत्यंत महागडा असून तो सामान्य माणसांच्या आवाक्यातला नाही. ही ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले आहेत.
तिरुवनंतपुरम : बुलेट ट्रेनचा प्रवास अत्यंत महागडा असून तो सामान्य माणसांच्या आवाक्यातला नाही. ही ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले आहेत. त्यापेक्षा सध्या देशाला आधुनिक, सुरक्षित, जलदगतीच्या रेल्वेगाड्या व यंत्रणेची गरज आहे असे कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोसारख्या प्रकल्पांचे माजी प्रमुख इ. श्रीधरन यांनी म्हटले आहे.
देशातील सर्व मेट्रो रेल्वे प्रकल्पांची मानकनिश्चिती करण्याचे काम ८६ वर्षे वयाचे मेट्रो मॅन इ. श्रीधरन यांच्यावर अलीकडेच केंद्र सरकारने सोपविले आहे. मानकनिश्चितीमुळे मेट्रो प्रकल्पांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्यांचे व सुट्या भागांचे उत्पादन सुरु करता येईल असे सांगून श्रीधरन म्हणाले की, मेट्रो रेल्वे व त्याच्याशी संबंधित गोष्टींचे उत्पादन मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत करण्यासाठीही हालचाली सुरु आहेत.
भारतीय रेल्वे जगापेक्षा वीस वर्षे मागे
देशभरात सध्या १३ मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम सुरु आहे. २० वर्षांच्या कालावधीत दिल्ली मेट्रोच्या जाळ््याचा २६० किमीपर्यंत विस्तार झाला आहे. तो जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा मेट्रो प्रकल्प आहे. मात्र अशी प्रगती भारतीय रेल्वेची झालेली नाही. बायो टॉयलेटची सुविधा वगळली तर रेल्वे यंत्रणेत फारसे आधुनिकीकरण झालेले नाही. गाड्यांचा वेग लक्षणीय म्हणावा इतका वाढलेला नाही. महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा वेगही कमी झाला आहे. गाड्या वेळेत सुटत नाहीत. रेल्वे अपघातांची आकडेवारी अचूक नसते. प्रगत देशांपेक्षा भारतातील रेल्वे यंत्रणा वीस वर्षे तरी मागे आहे.