Bullet Train India: सुरत-बिलिमोरा दरम्यान धावणार पहिली बुलेट ट्रेन; ५० किमी अंतर १५ मिनिटांत शक्य, रेल्वे मंत्र्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 08:41 AM2021-10-28T08:41:22+5:302021-10-28T08:51:07+5:30
Bullet Train India: सरकारने २०२३ पर्यंत देशातील बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
अहमदाबाद: गेल्या काही वर्षांपासून देशात बुलेट ट्रेनसंदर्भात अनेक चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणामुळे हा प्रकल्प रखडल्याचा दावा करण्यात येत आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचा मानस आहे. या प्रकल्पातील सुरत ते बिलिमोरा या मार्गादरम्यान पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भतील माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
सुरत ते बिलिमोरा मार्गादरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे काम जलदगतीने सुरू आहे. प्रत्येक महिन्याला ५० खांब उभारले जात आहेत. या कामाचा धडाका पाहता बुलेट ट्रेनचे काम निर्धारित वेळात पूर्ण होईल, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सन २०२३ पर्यंत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करणार?
सरकारने २०२३ पर्यंत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. या मार्गादरम्यान आताच्या घडीला १२ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. असे असले तर महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पातील सगळ्या बैठकींमध्ये महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणाचा मुद्दा कायम येत असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, दिल्लीतील सराय काले खां येथून बुलेट ट्रेन सुरू होणार असून, पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीपर्यंतच्या ८६५ किमी मार्गावर ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली ते वाराणसी या मार्गावर १२ स्थानके निश्चित करण्यात येणार आहेत. यामधील काही मार्ग एलिव्हेडेट असेल, असे सांगितले जात आहे. दिल्लीहून सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी नोएडा, मथुरा, आग्रा, इटावा, कन्नौज, लखनऊ, अयोध्या, रायबरेली, प्रयागराज, भदोही आणि वाराणसी अशी स्थानके नियोजित करण्यात आली आहेत.