संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 07:01 AM2024-08-01T07:01:50+5:302024-08-01T07:02:21+5:30
हा प्रकल्प सध्या जपानच्या सहकार्याने साकारण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बुलेट ट्रेन बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी जाहीर केले. त्यांनी लोकसभेत सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प साकारणार असून, त्यांचे तंत्रज्ञान खूप गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प सध्या जपानच्या सहकार्याने साकारण्यात येत आहे.
बुलेट ट्रेनसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर दिले. अश्विनी वैष्णव म्हणाले की, बुलेट ट्रेनसाठी अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था, तसेच त्याच प्रकारची देखभाल यंत्रणा लागणार असल्यामुळे हा प्रकल्प राबविताना जपानच्या रेल्वे यंत्रणेची मदत घेतली आहे. भारतीय हवामान, तसेच या देशातील गरजा लक्षात घेऊन सदर प्रकल्पाची आखणी झाली. त्यासाठी केली जाणारी बांधकामे, रुळांची निर्मिती, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन, ट्रेनचे डबे अशा गोष्टींची पूर्तता झाल्यानंतरच हा प्रकल्प कधी पूर्ण होईल हे ठामपणे सांगता येईल. बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालून २१ किमी लांबीचा बोगदा बांधण्याचे काम सुरू आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा असणार आहे.
‘महाराष्ट्रातील कामांनी घेतला वेग’
रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबादमध्ये ५२० किमीचे अंतर आहे. मात्र, बुलेट ट्रेनच्या रेल्वे प्रकल्पाची लांबी ५०८ किमी आहे. त्यातील ३२० किमीच्या टप्प्यातील कामे सध्या वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पाची महाराष्ट्रातील कामे थंडावली होती. मात्र, त्या राज्यात २०२२ साली भाजप-शिवसेनेचे राज्य सरकार आले, तसेच प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या राज्य सरकारने दिल्या. आता येथे बुलेट ट्रेन कामाने वेग घेतला आहे.