बुलेट ट्रेन पाण्याखालूनही धावणार
By admin | Published: April 21, 2016 04:26 AM2016-04-21T04:26:31+5:302016-04-21T04:26:31+5:30
मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन तब्बल २१ किलोमीटरचे अंतर समुद्रातून धावणार आहे. त्यामुळे समुद्रातून रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव लाखो भारतीयांना मिळणार आहे.
नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन तब्बल २१ किलोमीटरचे अंतर समुद्रातून धावणार आहे.
त्यामुळे समुद्रातून रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव लाखो भारतीयांना मिळणार आहे. मात्र त्यासाठी भारतात बुलेट ट्रेन सुरू होण्याची वाट पाहावी लागेल.
मुंबई ते अहमदाबाद या मार्गात २१ किलोमीटर अंतर समुद्रातील असून, तो भाग ठाण्याचा आहे. तिथे बुलेट ट्रेनसाठी समुद्रामध्ये बोगदे बांधण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे रेल्वेने ठरवले असले तरी तो प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल, हे मात्र रेल्वेचे अधिकारी सांगू शकले नाहीत. याचे कारण प्रत्यक्ष काम सुरू व्हायलाच २0१८ साल उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.
या प्रकल्पाला ९७ हजार ६३६ कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी ८१ टक्के रकमेचे कर्ज जपानकडून 0.१ टक्के व्याजाने मिळणार आहे. उरलेल्या रकमेत ५0 टक्के वाटा रेल्वेचा असेल आणि महाराष्ट्र व गुजरात प्रत्येकी २५ टक्के रक्कम देतील.