30 जूनला आपल्याला देवाची भेट घडेल; 11 मृतदेह सापडलेल्या घरातील रजिस्टरनं एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 10:49 AM2018-07-02T10:49:27+5:302018-07-02T10:50:54+5:30
30 जूनच्या रात्रीच एकाच घरात आढळून आले 11 मृतदेह
दिल्ली: एकाच घरात 11 मृतदेह आढळून आल्यानं काल देशाची राजधानी हादरून गेली. एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. यातील 10 जणांचे मृतदेह हॉलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. तर एक मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी घरातील कागदपत्रांचा तपास केला असून त्यामधून समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे.
बुरारीमधील एकाच घरात काल 11 मृतदेह सापडले. अंधश्रद्धेतून या कुटुंबानं स्वत:ला संपवलं असावं, अशी प्राथमिक शक्यता तपासातून पुढे येत आहे. पोलिसांना या घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये अलौकिक शक्ती, मोक्षप्राप्तीसाठी मृत्यू हाच एकमेव मार्ग, आत्मा आणि अध्यात्म यांचा परस्परांशी असलेला संबंध अशा स्वरुपाचा मजकूर आढळून आला आहे. या रजिस्टरमधील शेवटची नोंद ही 26 जूनला झाली आहे. 'आपण 30 जूनला देवाला भेटणार आहोत. देवाच्या भेटीसाठी आपण सर्व हात, पाय, तोंड पूर्णपणे बांधू,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आहे.
या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तपास पथकाला घरातील रजिस्टरमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. 'मोक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला जीवनाचा त्याग करायला हवा. जीवनाचा त्याग करण्यासाठी आपल्याला मरणाला कवटाळायला हवं. आयुष्य संपवताना थोडा त्रास होईल. मात्र कष्टातून, त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी डोळे बंद करायला हवेत,' असा मजकूर रजिस्टारमध्ये सापडला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही रजिस्टरमधील काही पानांमधील माहिती धक्कादायक आहे. कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकायला हवं, याचा तपशील रजिस्टरमध्ये आहे. कुटुंबातील कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकूवन जीव द्यावा, याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह अगदी रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीनुसार लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत.