जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:44 PM2021-10-28T12:44:01+5:302021-10-28T12:44:19+5:30
PMOने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय, तर 12 हून अधिक लोक जखमी आहेत. थात्री-दोडा मार्गावरील सुई गवारी येथे गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, मिनी बस थाथरीहून दोडाकडे जात होती, यावेळी सुई गवारी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले. जखमींना उपचारासाठी जीएमसी दोडा येथे नेण्यात आले.
या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच, पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्विटनुसार, पीएम मोदी म्हणाले- 'जम्मू आणि काश्मीरमधील डोडाच्या थाथरीजवळ झालेल्या रस्ते अपघातामुळे मी दु:खी झालो. या दु:खाच्या प्रसंगी मी कुटुंबियांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.' दरम्यान, PMOने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.
डोडाच्या अतिरिक्त एसपींनी सांगितले की, थाथरीहून डोडाकडे मिनी बस जात होती. यादरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू केले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, 'आत्ताच डीसी डोडा विकास शर्मा यांच्याशी बोललो, जखमींना जीएमसी डोडा येथे पाठवले जात आहे. योग्य ती सर्व मदत पुरवली जाईल.'