एक्स्प्रेस वेवर चालत्या बसच्या ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; बसमध्ये होते 40 प्रवासी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:45 PM2023-09-16T12:45:30+5:302023-09-16T12:46:55+5:30
एका सरकारी बसच्या चालकाला बस चालवताना हार्ट अटॅक आला आहे. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते.
उत्तर प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका सरकारी बसच्या चालकाला बस चालवताना हार्ट अटॅक आला आहे. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. बस दरीत पडली. 20 प्रवासी जखमी झाले मात्र सर्वजण बचावले. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर मसुरीजवळ गुरुवारी ही झाला. महामार्गावर बस रस्त्याच्या मधोमध जात असताना चालकाला हार्ट अटॅक आला. त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि रेलिंगला आदळल्यानंतर ती दरीत पडली.
उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (UPSRTC) ने एका निवेदनात म्हटलं आहे की, बस मेरठ डेपोतून निघाली होती आणि गाझियाबादमधील कौशांबीला जात होती. गाझियाबादमधील नूरपूर अंडरपास परिसरात हा अपघात झाला. यूपी स्टेट ट्रान्सपोर्टने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या उपचारासाठी त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल. बस चालकाला हार्ट अटॅक आला, त्यानंतर त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. असे असतानाही त्याने बसवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि बस उलटण्यापासून वाचवली.
प्रदीप कुमार असं चालकाचं नाव असून त्याचा कंडक्टर सुबोध कुमार या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना इतर प्रवाशांसह उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात गुरुवारी दुपारी 4.30 वाजता हायवे पेट्रोलिंग टीमने पाहिला. याबाबत त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पेट्रोलिंग टीमने सांगितले की, अपघातानंतर काही वेळातच दुसरी टीम तेथे पोहोचली आणि जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. चालकाला हार्ट अटॅक आल्याचे दिसते. त्याच्या तोंडाला फेस येत होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला. मेरठहून गाझियाबादला जाणाऱ्या बसला मसुरी पोलिस स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर अपघात झाला. हा अपघात कसा झाला, याचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. तपासानंतर हे प्रकरण समोर येईल. या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खड्ड्यात पडण्यापूर्वी बस अन्य कोणत्या वाहनाला धडकली होती की नाही याबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.