वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग, 10 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 09:23 AM2020-02-10T09:23:10+5:302020-02-10T09:23:27+5:30
वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे.
भुवनेश्वरः वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे. या दुर्दैवी घटनेत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 22 प्रवासी जखमी आहेत. पाच जणांचा मृत्यू हा घटनास्थळीच झाला, तर पाच जणांचा एमकेसीजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती गंजामचे जिल्हाधिकारी विजय अमृत कुलांगे आणि ब्रह्मपूर पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी दिली आहे. एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू रुग्णालयात नेत असतानाच झाला. तसेच जखमींपैकी पाच जणांची परिस्थिती नाजूक आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ती बस जंगलपाडूहून चिकरादाला जात असताना ही घटना मनदाराजपूरमध्ये घडली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. बसमधील लोक जवळच असलेल्या गावात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचदरम्यान 11 किलोवॉटच्या क्षमतेची वीजेची तार बसच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागली. अग्निशामक दलाचे अधिकारी सुकांत सेठी यांनी आग विझवण्यात आल्याची माहिती दिली आहे. दुर्घटनेनंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला असून, बसमधील लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बसच्या टपावर सामान होतं, बसचालकानं रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी वाहनाला रस्ता देण्याच्या प्रयत्नात असतानाच वीजतारेच्या संपर्कात आली.
Odisha Chief Minister's Office (CMO): CM Naveen Patnaik has announced an ex-gratia of Rs. 2 lakhs each for the kin of the deceased & free treatment to injured. https://t.co/gBH2J3CGLm
— ANI (@ANI) February 9, 2020
सीएमनं व्यक्त केलं दुःख; भरपाईची घोषणा
ओडिशातल्या नवीन पटनायक सरकारनं या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन दोन लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच अपघातातील जखमींवर विनाशुल्क उपचार करण्याचीही घोषणा केली आहे.