बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतून परतत हाेते जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 07:26 AM2022-08-17T07:26:57+5:302022-08-17T07:27:18+5:30

बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

Bus overturns in valley, seven jawans die, incidents in Kashmir, jawans returning from safety of Amarnath Yatra | बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतून परतत हाेते जवान

बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतून परतत हाेते जवान

Next

- सुरेश डुग्गर

श्रीनगर : अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेतून परतणाऱ्या जवानांवर काळाने घाला घातला. काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात इंडाे तिबेट सीमा पाेलीस दलाच्या जवानांना नेणारी बस खाेल दरीत काेसळली. त्यात ७ जवानांचा मृत्यू झाला. तर ३२ जवान जखमी झाले आहेत. या बसमध्ये जम्मू आणि काश्मीर पाेलीस दलाचेही २ जवानांचा समावेश आहे. 

बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सुमारे १०० फूट खाेल दरीत नदीपात्रात काेसळली. एवढ्या उंचीवरून काेसळल्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात दाेन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जवानांची प्राणज्याेत उपचारादरम्यान मालवली. 

राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आदी मान्यवरांनी शाेक संवेदना व्यक्त केल्या.

जवानाने सांगितला घटनाक्रम
अपघातातून बचावलेल्या काही जवानांनी घटनेबाबत माहिती दिली. अनंतनाग येथे उपचारासाठी दाखल झालेले हेड काॅन्स्टेबर खेरनार बापू यांनी सांगितले, की मी ४० सहकाऱ्यांसह पाेशपथरी कॅम्प येथून निघालाे हाेताे. फ्रिसलानाजवळ एका वळणावर चालक अचानक ओरडला की ब्रेक लागत नाही, ब्रेक फेल झाला आहे. त्यानंतर काही क्षणात बस दरीत काेसळली. घटनेनंतर काही स्थानिक धावत आले. त्यांनी मदत केली, असे ते म्हणाले. खेरनार यांच्या पायाला जखमी झाली आहे.

मे महिन्यातही झाला असाच अपघात
२७ मे राेजी लडाखजवळ असाच अपघात घडला हाेता. श्याेक नदीत जवानांची बस काेसळल्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाला हाेता. सर्व जवान तुरतूक येथे तैनातीसाठी जात हाेते.

८ जण गंभीर
८ जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्रीनगर येथे उपचार करण्यात येत आहेत. इतर जखमींवर अनंतनाग येथे उपचार सुरू आहेत. इतरांची प्रकृती स्थिर आहे. 
    - एस. एल. थाओसेन, 
    आयटीबीटी महासंचालक  

मृतांची नावे
- दुला सिंह (पंजाब)
- अभिराज (बिहार)
- अमित के (उत्तर प्रदेश)
- डी. राज शेखर (आंध्र प्रदेश)
- सुभाष बैरवाल (राजस्थान)
- दिनेश बाेहरा (उत्तराखंड)
- संदीप कुमार (जम्मू)

Web Title: Bus overturns in valley, seven jawans die, incidents in Kashmir, jawans returning from safety of Amarnath Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.