बस पेटून २४ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Published: June 6, 2017 04:42 AM2017-06-06T04:42:56+5:302017-06-06T04:42:56+5:30

ट्रकशी धडक झाल्यामुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस पेटून २४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

Bus passes 24 passenger deaths | बस पेटून २४ प्रवाशांचा मृत्यू

बस पेटून २४ प्रवाशांचा मृत्यू

Next

बरेली : ट्रकशी धडक झाल्यामुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस पेटून २४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी ही भयंकर दुर्घटना घडली. यात १४ प्रवासी जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस दिल्लीहून पूर्व उत्तर प्रदेशातील गोंडा येथे जात असताना बडा बायपास येथे अपघातग्रस्त झाली. बसमध्ये ४१ प्रवासी होते. प्रवाशांचे मृतदेह एवढे होरपळले आहेत
की, डॉक्टरांना ते पुरुषाचे आहेत की, स्त्रीचे हे ठरविणेही कठीण झाले
आहे. मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. मृतांची संख्या वाढून २४ झाली
असून गंभीररीत्या होरपळलेल्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत, असे उत्तर प्रदेशचे मंत्री राजेश अग्रवाल यांनी सांगितले. बसमधील तीन प्रवासी बचावले असून त्यांना किरकोळ इजा झाली आहे.
हा अपघात रात्री उशिरा एक ते दीड वाजण्याच्या सुमारात झाला, असे पोलीस अधीक्षक जोगेंद्रकुमार यांनी सांगितले. ट्रकशी धडक झाल्यानंतर बसची इंधन टाकी फुटली आणि त्यामुळे आग लागली, असेही दुर्घटना पाहणाऱ्यांनी सांगितले.
पहाटे पावणेसहा वाजता दुर्घटनास्थळावरून २२ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले. ओळख पटू न शकण्याइतपत ते जळाले असून मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा हे ठरविणेही कठीण झाले आहे, असे बरेली जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शैलेश रंजन यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतरच मृतांपैकी पुरुष किती आणि स्त्रिया किती हे सांगता येईल, असे बरेलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय यादव म्हणाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून अग्रवाल मदतकार्याच्या देखरेखीसाठी हेलिकॉप्टरने येथे दाखल झाले. सर्व मृतदेहांची डीएनए टेस्ट करण्यात येईल, असे ते म्हणाले. मृतांत बसचालकाचाही समावेश असून कंडक्टर गंभीर जखमी आहे. ट्रक शहाजहानपूरकडून येत होता. ट्रकचा चालक फरार झाला आहे. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अग्निशमन वाहने त्वरेने घटनास्थळी पोहोचली. तथापि, आग खूप भडकली होती. त्यामुळे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून बसमध्ये जाण्यास वेळ लागला, असे पोलीस अधिकारी एस. के. भगत यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>आर्थिक मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले.
मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली.

Web Title: Bus passes 24 passenger deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.