१२ वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलावर केले अंत्यविधी; आता एका पत्रामुळं आला ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 08:08 AM2021-12-18T08:08:17+5:302021-12-18T08:08:43+5:30
१२ वर्षापूर्वी छवी घरातून बाहेर पडला होता त्यावेळी त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती असं गावातील लोकांनी सांगितले.
बक्सर – बिहारच्या बक्सर येथे एका कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. जेव्हा अचानक त्यांना कळालं की, १२ वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाला मृत समजून अंत्यसंस्कार केले होते. तो जिवंत आहे आणि पाकिस्तानच्या एका जेलमध्ये बंद आहे. मुलाच्या जिवंत असल्याची माहिती कळताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबू शकले नाहीत. जवळपास १२ वर्षापूर्वी मुफ्फसिल परिसरातील खिलाफतपूर येथे राहणारा छवी घरातून बेपत्ता झाला होता. त्यावेळी त्याचे वय १८ वर्ष होते. नातेवाईकांना त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु हाती काहीच लागलं नाही.
या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, विशेष शाखेकडून आलेल्या पत्रातून हा प्रकार उघड झाला. छवी नावाचा व्यक्ती जो खिलाफतपूरमध्ये राहत होता. आम्ही पूर्ण तपास करुन रिपोर्ट पाठवणार आहोत. परंतु पत्रात हा मुलगा यावेळी कुठे आहे त्याचा उल्लेख नाही. तर नातेवाईक सांगतात की, छवी पाकिस्तानात असल्याचं पोलीस म्हणाले. पोलीस ठाण्याकडून छवीची ओळख पटवण्यासाठी एक पत्र आणि फोटो आला होता.
१२ वर्षापूर्वी घरातून झाला होता बेपत्ता
छवीच्या वडिलांचे निधन झाले आहे तर आई माहेरी राहत असते. मोठा भाऊ आणि त्याची बायको यांना पोलिसांनी सांगितले की, छवी जिवंत असण्याची शक्यता आहे आणि तो पाकिस्तानच्या जेलमध्यं कैद आहे. हे ऐकून गावात बातमी पसरली आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. १२ वर्षापूर्वी छवी घरातून बाहेर पडला होता त्यावेळी त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती असं गावातील लोकांनी सांगितले.
कुटुंबामध्ये आनंद
छवीने इतक्या वर्षांनी पाकिस्तानी प्रशासनाला त्याचं, आई वडिलांचे, गावाचे नाव सांगितले. पण छवी पाकिस्तानात नेमका कसा पोहचला? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील मुलगा बेपत्ता झाला. तो सापडत नाही. म्हणून कुटुंबाने त्याला मृत समजून अंत्यविधी उरकले होते. परंतु आता तो जिवंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याला पाकिस्तानातून भारतात आणावं अशी आशा कुटुंबाला आहे.