२५0 कोटींच्या जुन्या नोटांद्वारे सोने खरेदी
By admin | Published: December 25, 2016 01:05 AM2016-12-25T01:05:10+5:302016-12-25T01:05:10+5:30
दिल्ली मनी लाँड्रिंगचे केंद्र बनली असून प्राप्तिकर विभागाने धाडी सुरू केल्या आहेत. नोटाबंदीनंतर २५0 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सोने खरेदी वापरण्यात आल्याचे
नवी दिल्ली : दिल्ली मनी लाँड्रिंगचे केंद्र बनली असून प्राप्तिकर विभागाने धाडी सुरू केल्या आहेत. नोटाबंदीनंतर २५0 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सोने खरेदी वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.
प्राप्तिकर विभाग, ईडी व महसुली गुप्तचर संचालनालय यांनी यापूर्वीच सराफा बाजारातील ४00 कोटींचे बेकायदेशीर व्यवहार उघडकीस आणले आहेत.
ताज्या कारवाईत आयकर विभागाने दिल्लीच्या करोल बाग आणि चांदणी चौक भागातील चार सराफा व्यापाऱ्यांची चौकशी केली. गेल्या आठवड्यांत २५0 कोटींच्या बंद नोटा घेऊन सोन्याची विक्री केल्याचे आढळून आले. आणखी १२ दुकांनात यासंबंधीची चौकशी सुरू होती. त्यातून प्रचंड मोठ्या रकमांचे मनीलाँड्रिंग समोर येण्याची शक्यता आहे. चार सराफा व्यापाऱ्यांच्या चौकशीत आढळून आलेल्या माहितीनुसार, अनेक बँक खात्यांचा वापर करून काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे. काही बनावट कंपन्यांच्या नावे हा पैसा बँकांत भरण्यात आला. तेथून तो योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. या बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे. तथापि, त्यातील कार्यपद्धती आधी उघडकीस आलेल्या प्रकरणांसारखीच आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
केरळात ३७ लाख जप्त
केरळातील मलप्पुरम जिल्ह्यात केलल्या कारवाईत पोलिसांनी ३७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम नव्या नोटांत आहे. जिल्ह्यातील तिरुर शहरात ही कारवाई करण्यात आली. अन्य एका घटनेत पोलिसांनी २.५ लाख जप्त केले आहेत.