हेलिकॉप्टर खरेदी; खेतान यांना अटक
By Admin | Published: September 24, 2014 03:34 AM2014-09-24T03:34:15+5:302014-09-24T03:34:15+5:30
सक्तवसुली संचालनालयाने ३,६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाशी संबंधित चौकशीअंतर्गत मंगळवारी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने ३,६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाशी संबंधित चौकशीअंतर्गत मंगळवारी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपी कंपनीच्या संचालक मंडळाचा माजी सदस्य गौतम खेतान याला मंगळवारी अटक करण्यात आली.
या प्रकरणी गुन्हेगारी पद्धतीने मिळविलेली संपत्ती वैध दाखविल्याच्या आरोपाखाली ही पहिली अटक आहे. व्हीव्हीआयपी ३,६०० कोटी रुपयांची कथित लाच प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. ईडीने काल खेतानच्या राजधानी दिल्लीतील दोन घरांची झडती घेतल्यानंतर अटक झाली.
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, खेतानला मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. काल ईडीने चौकशीदरम्यान, खेतानच्या घरातून सुमारे एक कोटी रुपये मूल्य असलेले दागिने जप्त केले होते. तसेच काही महत्त्वपूर्ण वित्तीय दस्तऐवजही आपल्या ताब्यात घेतले होते. अगुस्ता वेस्टलँडच्या १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराची सध्या चौकशी सुरू आहे.
सक्तवसुली संचालनालयाने यंदा जुलैमध्ये खेतान, माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी आणि अन्य १९ जणांविरोधात फौजदारी कलमान्वये एफआयआर दाखल केला होता. खेतान हे चंदीगड येथील एअरोमॅट्रिक्स नामक कंपनीच्या संचालक मंडळात होते. हेलिकॉप्टर व्यवहाराच्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी कथितरीत्या बनावट कंपनीच्या माध्यमातून काम करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)