घराची खरेदी करा ऑनलाइन; ‘नारडेको’च्या पोर्टलवर देशातील घरांची माहिती मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 04:12 AM2020-01-16T04:12:30+5:302020-01-16T04:12:50+5:30
या पोर्टलवर बांधकाम व्यावसायिक सर्वोत्तम प्रस्ताव देऊ शकतील. ग्राहक पोर्टलवरूनच २५ हजार रुपये भरून घर बुक करू शकतील.
नवी दिल्ली : ‘नॅशनल रिअर इस्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (नारेडको) देशातील पहिले ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर बांधून तयार असलेल्या घरांची माहिती बांधकाम व्यावसायिक टाकू शकतील, तसेच ग्राहक तेथून घरे खरेदी करू शकतील.
पुढील एक महिना बांधकाम व्यावसायिक पोर्टलवर घरांचा तपशील टाकू शकतील. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांचा तपशीलच पोर्टलवर टाकता येईल. त्यानंतर, ४५ दिवस ही घरे विक्रीसाठी उपलब्ध असतील. पहिल्या १५ दिवसांत खरेदीदार प्रस्ताव पाहू शकतील, तसेच घरे शॉर्टलिस्ट करू शकतील. १ मार्च ते ३१ मार्च या काळात त्यांना प्रत्यक्ष घरखरेदीही करता येतील. केंद्रीय गृहनिर्माण सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी हे पोर्टल रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अॅमेझॉनसारखे काम करेल, असे म्हटले आहे. जाणकारांना वाटते की, लोक आॅनलाइन घरे खरेदी करणार नाहीत. तथापि, त्यांना उपलब्ध घरांची विस्तृत माहिती मिळण्यास पोर्टलची मदत होईल.
नारेडकोने म्हटले की, या पोर्टलवर बांधकाम व्यावसायिक सर्वोत्तम प्रस्ताव देऊ शकतील. ग्राहक पोर्टलवरूनच २५ हजार रुपये भरून घर बुक करू शकतील. बुकिंग रक्कम पूर्णत: परत मिळू शकेल. या पोर्टलवर किमान १ हजार प्रकल्प नोंदणीकृत आहेत.
पोर्टलचे लाँचिंग करताना मिश्रा यांनी सांगितले की, संभाव्य घर खरेदीदारांसाठी हे मोठे पाऊल आहे. मी सर्व संबंधितांशी चर्चा केली आहे. मी त्यांना सांगितले की, पोर्टलवर विश्वासार्हता महत्त्वाची आहे. घर खरेदीदारास स्थळ आणि किंमत याबाबतची यथार्थ माहिती पोर्टलवर मिळायला हवी.