पेट्रोल-डिझेल भरा अन् मिळवा बाईक, लॅपटॉप फ्री फ्री फ्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:27 PM2018-09-11T12:27:23+5:302018-09-11T12:30:13+5:30
इंधन विक्री कमी होऊ नये म्हणून पेट्रोल पंप मालकांच्या ऑफर
भोपाळ: पेट्रोल, डिझेल भरा आणि बाईक, लॅपटॉप, एसी, वॉशिंग मशीन मोफत मिळवा, अशी ऑफर मध्य प्रदेशातील अनेक पेट्रोल पंपांच्या मालकांकडून दिली जात आहे. सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंधन विक्री कायम राहावी, यासाठी पेट्रोल पंप मालकांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत.
मध्य प्रदेश सरकार पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट लावतं. त्यामुळे इंधनाचे दर भडकले आहेत. राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर जास्त असल्यानं मध्य प्रदेशातील अनेक ट्रक, टेम्पो चालक राज्याबाहेर जाऊन इंधन भरतात. यासोबतच सीमावर्ती भागात राहणारे नागरिकही दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरतात. याचा फटका राज्यातील पेट्रोल पंप मालकांना बसतो आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता पेट्रोल पंप मालकांनी अनेक योजना आणल्या आहेत.
काही पेट्रोल पंप मालक 100 लिटर डिझेल भरल्यावर ट्रक चालकांना मोफत चहा आणि नाश्ता देत आहेत. तर काही पेट्रोल पंप मालकांनी 5 हजार लिटर डिझेल खरेदीवर मोबाईल, सायकल आणि मनगटी घड्याळ मोफत दिलं जाईल, असे फलक लावले आहेत. 15 हजार लिटर डिझेल खरेदी करा आणि कपाट, सोफा सेट, 100 ग्रॅमचं चांदीचं नाणं मिळवा, अशाही ऑफर देण्यात येत आहेत. तर 25 हजार लिटर खरेदी केल्यावर ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, 50 हजार लिटर डिझेल खरेदीवर स्प्लिट एसी, 1 लाख लिटरच्या खरेदीवर स्कूटर किंवा मोटारसायकल मोफत अशा ऑफरदेखील पेट्रोल पंप मालकांनी दिल्या आहेत.