अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारत रशियाकडून क्षेपणास्त्रे खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 09:56 PM2018-09-02T21:56:25+5:302018-09-02T21:57:13+5:30
नवी दिल्ली : रशियाकडून क्षेपणास्त्रे खरेदी करण्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केलेली असूनही भारत रशियाकडून एस-400 ही प्रणाली खरेदी करणार आहे. तसेच अमेरिकेला द्विस्तरीय चर्चेदरम्यान या 40 हजार कोटींच्या या सौद्याबाबत कल्पना देणार असल्याचेही अधिकृत सुत्रांनी सांगितले.
अमेरिकेच्या मंत्र्यांसोबत येत्या 6 सप्टेंबरला बैठक होणार आहे. यामध्ये भारत अमेरिकेला सांगणार आहे, की बंदी आणण्याआधीच रशियाशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खरेदी करण्याचा करार झाला होता. 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने रशियाच्या सैन्यावर बंदी आणली होती. ट्रम्प प्रशासनाने अन्य देशांनाही रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी केल्यास त्यांच्यावरही बंदी आणण्याचा इशारा दिला होता.
भारताने रशियाकडून एस-400 ही प्रणाली खरेदी केल्यास याची खात्री देता येऊ शकत नाही की अमेरिका भारतावर निर्बंध लादेल.
या आठवड्याच होणारी बैठक गेल्या वर्षीत ठरली होती. या बैठकीमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन या सहभागी होणार आहेत. तर अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस सहभागी होणार आहेत. सुत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या ऑक्टोबरमधील बैठकीपूर्वीच या व्यवहाराची घोषणा होऊ शकते.
काय ताकद आहे या एस-400ची...
रशियाचे एस-400 हे मिसाईल 4 हजार किमी लांबवर मारा करू शकते. यामुळे अत्याधुनिक मिसाईलमुळे वायुसेनेची ताकद प्रचंड वाढणार आहे. भारत गेल्या काही काळापासून चीनच्या सीमेवर लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याचा विचार करत होता. मात्र, चीनकडे 2014 पासूनच हे मिसाईल आहे. रशियाकडून हे मिसाईल घेणारा चीन हा पहिला देश आहे. रशियाकडे एस-300 ही मिसाईल आहेत. हे मिसाईल 2007 मध्ये बनविण्यात आले होते.