प्रतिष्ठेच्या लढाईत अपक्ष उमेदवाराने दिला लालू आणि नितीश कुमारांना धक्का, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 04:26 PM2024-07-13T16:26:24+5:302024-07-13T16:27:00+5:30
By Election Result 2024: बिहारमधील रुपौली विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अत्यंत चुरशीच्या झालेल्या रुपौली मतदारसंघातील पोटनिवडुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे.
आज सात राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये इंडिया आघाडीने आपला दबदबा राखल्याचं दिसत आहे. दरम्यान, बिहारमधील रुपौली विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अत्यंत चुरशीच्या झालेल्या रुपौली मतदारसंघातील पोटनिवडुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. रुपौलीमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने दिलेल्या उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी विजय मिळवला आहे.
रुपौली विधानसभा मतदारसंघात लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीच्या उमेदवार बीमा भारती, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे उमेदवार कलाधर मंडल आणि अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांच्यात मुख्य लढत झाली होती. बीमा भारती यांनी जेडीयूमधून आरजेडीमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीकडून लढणाऱ्या बीमा भारती यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आरजेडीने त्यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा संधी दिली.
दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या सहा फेऱ्यांमध्ये जेडीयूचे कलाधर मंडल यांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर ते पिछाडीवर पडले. दरम्यान, येथून पाच वेळा आमदार राहिलेल्या बीमा भारती ह्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर होत्या. तसेच मतमोजणीच्या उत्तरार्धात त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. तर अपक्ष शंकर सिंह यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी टिकवताना जेडीयूच्या कलाधर मंडल यांचा ८ हजार २४६ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांना ६८ हजार ०७० मतं मिळाली. तर कलाधर मंडल यांना ५९ हजार ८२४ मतं मिळाली. बीमा भारती यांना ३० हजार ६१९ मतांवर समाधान मानावं लागलं.
दरम्यान, अपक्ष निवडून आलेले शंकर सिंह हे या भागातील बाहुबली नेते आहेत. शंकर सिंह आणि बीमा भारती यांचे पती अवधेश मंडल यांच्यात जुना वाद आहे. पूर्वी लोकजनशक्ती पक्षात असलेल्या शंकर सिंह यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तसेच त्यात ते विजयी देखील झाले.