१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 01:16 PM2024-03-17T13:16:47+5:302024-03-17T13:17:53+5:30
अकोल्यात २६ एप्रिलला पोटनिवडणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: लोकसभेसाेबतच १३ राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणाही निवडणूक आयोगाने केली. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिहार, हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड, त्रिपुरा, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या नऊ राज्यांतील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेची तर, हिमाचल प्रदेशातील ६, गुजरातमधील ५, उत्तर प्रदेशातील ४ आणि पश्चिम बंगालमधील दोन जागांची पोटनिवडणूक आयोगाने घोषित केली आहे.
अकोल्यात २६ एप्रिलला पोटनिवडणूक
- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी २६ एप्रिलला मतदान होईल.
- या मतदारसंघातून सहा वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले.
- त्यामुळे ही जागा रिक्त आहे. येथे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. हा मतदारसंघ १९९५ पासून भाजपचा गड राहिला आहे.
- गोवर्धन शर्मा यांनी प्रथम १९९५ मध्ये येथून विजय मिळविला होता. त्यानंतर सलग सहा वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
चार दिवसांपूर्वी राजीनामा तेथे पोटनिवडणूक
विशेष म्हणजे १२ मार्चला हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाचा, तसेच १३ मार्चला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचाही यामध्ये समावेश आहे.
फेब्रुवारीत हिमाचल प्रदेशातील सहा आमदार अपात्र तेथेही पोटनिवडणूक
- हिमाचल प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात राज्यसभा निवडणूक झाली हाेती.
- त्यावेळी पक्षादेश डावलून विरोधी उमेदवाराला मतदान केल्याप्रकरणी अपात्र ठरविण्यात आलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांच्या मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
- या अपात्रतेला या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिले आहे. त्यांच्या याचिकेवर १८ मार्चला सुनावणी होणार आहे.
तयारी तर केली, पण खानापूर आटपाडीची पोटनिवडणूक कधी?
- खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांचे ३१ जानेवारी २०२४ रोजी निधन झाल्याने ही जागाही रिक्त झाली आहे.
- या जागेची पोटनिवडणूकही लोकसभेसोबत होईल, अशी अपेक्षा होती. आयोगाने जिल्हा प्रशासनाला तयारीत राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
- पोट निवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही जिल्हा प्रशासनाने आणली आहेत. मात्र लोकसभेसोबत या जागेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने ती आता कधी होणार हा प्रश्न आहे.