नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 09:42 AM2024-10-16T09:42:42+5:302024-10-16T09:43:49+5:30

वायनाड लोकसभा मतदारसंघ व विधानसभांच्या ४७ जागांसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होईल, तर नांदेड लोकसभा मतदारसंघ व केदारनाथ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

By-elections to be held for Nanded, Wayanad; Also fighting for 48 assembly seats | नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत

नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ, तसेच विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. मात्र, पश्चिम बंगालमधील बसिरहाट, उत्तर प्रदेशमधील मिल्कीपूर विधानसभा निवडणुकांबाबत न्यायालयीन लढा सुरू असल्याने त्या दोन मतदारसंघांमध्ये आयोगाने पोटनिवडणुका जाहीर केल्या नाहीत.

वायनाड लोकसभा मतदारसंघ व विधानसभांच्या ४७ जागांसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होईल, तर नांदेड लोकसभा मतदारसंघ व केदारनाथ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. रायबरेलीची जागा आपल्याकडे ठेवून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा त्याग केला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली. वायनाडमधून प्रियांका गांधी निवडणूक लढविणार आहेत.

उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, सिक्कीम या राज्यांमध्ये ४८ विधानसभा आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

कार्यकर्ते भिडले -
रुपाहीहाटमध्ये काँग्रेसने बाइक रॅली काढल्यानंतर विरोधी पक्ष व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. रॅलीत सहभागी होण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक गट जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या दुचाकींचे नुकसान केले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे पोस्टर आणि बॅनर फाडले.
 

Web Title: By-elections to be held for Nanded, Wayanad; Also fighting for 48 assembly seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.