भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:31 PM2022-06-26T18:31:53+5:302022-06-26T18:32:47+5:30
Loksabha, Vidhan Sabha By-Polls Result: पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे दोन बालेकिल्ले फोडण्यात भाजपाला यश आले आहे.
पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे दोन बालेकिल्ले फोडण्यात भाजपाला यश आले आहे. आजम खान खासदार झालेला रामपूर आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव खासदार झालेले आझमगढ भाजपाने हिसकावून घेतले आहे.
भाजपाने बंपर विजय मिळविला आहे. आझमगढमधून भाजपाचे दिनेश लाल निरहुआ जिंकले आहेत. तर रामपूरमधून भाजपाचे घनश्याम लोधी यांनी विजय निश्चित केला आहे. दिनेश लाल यादव निरहुआ यांनी अखिलेश यादवांचा चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला आहे. २०१९ मध्ये अखिलेश यांनी निरहुआ यांचा अडीज लाख मतांनी पराभव केला होता. बसपाने मुस्लिम उमेदवार उभा करून सपाची मते आपल्याकडे वळविली होती. रामपूरहून घनश्याम लोधी यांनी ४० हजार मतांनी विजय मिळविला आहे.
पंजाबमध्ये आप सरकारला मोठा धक्का बसला आहे. संगरुर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सिमरणजीत सिंग मान हे जिंकले आहेत. भगवंत मान यांचा हा मतदारसंघ होता. आपचे उमेदवार गुरमील सिंग यांनी अटीतटीची लढत दिली.
विधानसभांमध्ये भाजपाची बाजी
दिल्लीतील राजिंदर नगर पोचनिवडणुकीत आपने ११ हजार मतांनी विजय मिळविला आहे. तर त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री मनिक साहा यांनी बरदोवलीमधून सहा हजार मतांनी विजय मिळविला आहे. साहा यांना मुख्यमंत्री पद कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक जिंकणे गरजेचे होते. त्रिपुरामध्ये चारपैकी तीन जागा भाजपाने जिंकल्या आहेत, एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. तर आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने मोठ्या फरकाने आत्मकुर सीट जिंकली आहे. भाजपाचा 82,888 मतांनी पराभव केला.