महाराष्ट्रातही सुरू होणार सी-प्लेन; दीड महिन्यात ठरणार धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:22 AM2018-04-10T04:22:13+5:302018-04-10T04:22:13+5:30
केंद्र सरकार लवकरच नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्याचा मुहूर्त घोषित करणार असून, सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणाऱ्या राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्याचा मुहूर्त घोषित करणार असून, सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणाऱ्या राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सी-प्लेनबाबत पुढील ४५ दिवसांत मार्गदर्शकतत्त्वे आणि नियम निश्चित करण्याचे ठरविले आहे. यातहत काही निवडक राज्यांतही कमी अंतरासाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्याची घोषणाही केली जाऊ शकते.
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नागरी उड्डयन सचिव आर. एन. चौबे हे येत्या दोन-तीन दिवसांत मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यत्वे नवी मुंबई विमानतळाबाबत ते चर्चा करतील. तीन वर्षांत नवी मुंबई विमानतळ सुरू करण्याचा नागरी उड्डयन मंत्रालयाचा इरादा आहे. त्यादृष्टीने विमानतळ उभारणीच्या कामासाठी प्राथमिक निविदाही चालू वर्षअखेर जारी करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे. त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत विमानतळ उभारण्याचे काम सुरू करता येईल. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य जरुरी असल्याने राज्य सरकारसोबत चर्चा करून काम सुरू करण्याचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याचा नागरी उड्डयन मंत्रालयाचा बेत आहे.
>काही निवडक शहरात सुरू करणार सी-प्लेन सेवा
अन्य एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सी-प्लेनबाबत ४५ दिवसांत धोरण ठरविणार आहे. एकेरी इंजिनच्या ‘सी-प्लेन’ला परवागनी द्यावी का? या मुद्यांवर दोन मतप्रवाह आहेत. एक गटाची यासंदर्भात नकारात्मक भूमिका आहे. दुहेरी इंजिनच्या सी-प्लेनलाच परवानगी द्यावी, असे या गटाचे म्हणणे आहे.दुसºया गटाचे असे म्हणणे आहे की, कमी अंतरासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याने एकेरी किंवा दुहेरी इंजिनबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. तथापि, एकेरी इंजिनच्या सी-प्लेनसाठी दोन वैमानिकांची अट असावी. जेणेकरून कोणतीही तांत्रिक समस्या निर्माण होणार नाही.
तथापि, याबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे प्रस्तावित धोरणातून स्पष्ट होईल. महाराष्टÑ, गुजरात तसेच दक्षिण भारतातील काही शहरांत सी-प्लेन सेवा सुरू केली जाऊ शकते. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे.