CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 09:56 AM2019-12-20T09:56:40+5:302019-12-20T09:57:25+5:30

Citizen Amendment Act : जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

CAA bill BJP MLA angry in Assam | CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज

CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज

googlenewsNext

गुवाहाटी: भाजपचे केंद्रीय नेते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे कितीही जोरदार समर्थन करीत असले तरी आसाममधील भाजपचे काही नेते व आमदार या कायद्यावर नाराज आहेत. जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल जनतेच्या मनात असलेली भीती तसेच संशय दूर करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी भाजपच्या आमदारांनी सोनोवाल यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर भाजपचे आमदार पद्म हजारिका यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

हजारिका म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आसाममधील भाजप व त्याच्या नेत्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. ते मंत्री कोण यांची नावे सांगण्यास मात्र हजारिका यांनी नकार दिला.

आसामी भाषा, संस्कृती, लोकांची वांशिक ओळख यांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. या गोष्टी टिकून राहाण्यासाठी आसाम करारातील सहा व सातव्या कलमाची त्वरित अंमलबजावणी करावी असा आग्रह मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्र सरकारकडे धरावा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.


तणावपूर्ण शांतता
नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात आसामसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यात हिंसाचारही झाला. त्यामुळे आसाममधील गुवाहाटीसह दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये बुधवारपासून तणावपूर्ण शांतता आहे. या कायद्याविरोधातील आंदोलनाचा ईशान्य भारतातील जोर अजूनही कमी झालेला नाही.

Web Title: CAA bill BJP MLA angry in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.