'सीएए', 'एनआरसी'पासून वाचण्यासाठी मुस्लिमांना हिंदु धर्मात 'घरवापसी'चे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:31 PM2020-01-20T16:31:46+5:302020-01-20T16:33:08+5:30
या बॅनरवर तीन महिला बुरख्यात दाखविण्यात आल्या असून त्यांना टिकली लावलेली दाखवण्यात आली आहे. तसेच 'हिंदू धर्म मे घरवापसी करो', असं आवाहन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायदा (सीएए) संसदेत पास झाल्यानंतर दिल्लीतील शाहीन बागसहित देशाच्या अनेक भागांत विरोध करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी या कायद्यावरून पोस्टर वॉर रंगल्याचे दिसत आहे. त्यातच वाराणसीत वादग्रस्त बॅनर लावण्यात आले आहे. यामध्ये मुस्लिमांना घरवापसीचा सल्ला देण्यात आला आहे.
हिंदू समाज पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष रोशन पांण्डेय यांनी वाराणसीत पोस्टर आणि बॅनरबाजी सुरू केली आहे. या बॅनरवर मुस्लिम महिलांसह सर्व मुस्लिमांना हिंदु धर्मात येऊन एनआरसी आणि सीएएपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. घरवापसी केल्यास दोन्ही कायद्यापासून सुटका होईल, असंही बॅनरवर म्हटलेलं आहे.
बॅनरवर शाहिन बागेत हिंदुविरोधी लागलेल्या कथित 'हम देखेंगे' पोस्टरचा देखील उल्लेख कऱण्यात आला आहे. तसेच 'हम भी देखेंगे' आणि 'हम देख रहे हे' असा इशारा देण्यात आला आहे. या बॅनरवर तीन महिला बुरख्यात दाखविण्यात आल्या असून त्यांना टिकली लावलेली दाखवण्यात आली आहे. तसेच 'हिंदू धर्म मे घरवापसी करो', असं आवाहन करण्यात आले आहे.