CAA Protest: हे तर चोर! अंथरुणं जप्त करणाऱ्या पोलिसांविरोधात महिला आंदोलकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:35 PM2020-01-19T15:35:55+5:302020-01-19T15:38:01+5:30
उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई कॅमेऱ्यात कैद; महिलांची जोरदार घोषणाबाजी
लखनऊ: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लखनऊमधल्या घंटाघर परिसरात आंदोलन सुरू आहे. या भागात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. डिफेन्स एक्प्सोमुळे कलम १४४ लागू करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. आंदोलनकर्त्यांकडील खाद्यपदार्थ, त्यांची अंथरुणं पोलिसांनी जप्त केली आहेत. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
लखनऊमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात महिलांचं शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. या महिलांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी बळाचा वापर सुरू असल्याचं काही व्हिडीओंमधून दिसत आहे. अनेक महिलांसोबत त्यांची लहान मुलंदेखील आंदोलनात सहभागी झाली आहेत. त्यांना हटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
Kon chor hai? Haan wahi!
— V (@Varishaaaa) January 18, 2020
What an embarrassment! #LucknowProtest#HusainabadClockTower#CAAProtest#GhantaGharpic.twitter.com/2PgpRuunb8
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास १०-१२ महिलांनी घंटाघर परिसरात आंदोलन सुरू करण्यात सुरुवात केली. या परिसराला वारसास्थळाचा दर्जा आहे. त्यामुळे बरेच पर्यटक या भागाला भेट देतात. शुक्रवारी १०-१२ महिलांचं आंदोलन सुरू असताना संध्याकाळच्या सुमारास परिसरात फिरायला आलेल्या आणखी काही महिलादेखील आंदोलनात सहभागी झाल्या. शनिवारी जवळपास आणखी ५०० महिला आंदोलनात सामील झाल्या. सध्या आंदोलनस्थळी एक हजारपेक्षा अधिक महिला असून यातल्या बहुतांश महिला लखनऊच्या आहेत.
जेवण आणि अंथरुणं आणून देणाऱ्या कुटुंबीयांना पोलीस आंदोलनस्थळापर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोप महिलांनी केला. आपल्याकडे असलेली अंथरुणं, खाद्यपदार्थ पोलिसांकडून काढून घेतले जात असल्याचा दावादेखील काही महिलांनी केला. पोलीस महिलांकडील अंथरुणं नेत असल्याचे काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी अंथरुणं आणि अन्नपदार्थ जप्त केल्यानं अनेक महिला रात्री घरी परतल्या. मात्र दुसऱ्या दिवशी आधीपेक्षाही जास्त महिला आंदोलनस्थळी दाखल झाल्या.