CAA: राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारण्यास नकार; गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीचा दीक्षांत सोहळ्यावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 07:56 AM2019-12-22T07:56:36+5:302019-12-22T07:58:20+5:30
अनेक विद्यार्थी दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहणार
पुद्दुचेरी: पुद्दुचेरी विद्यापीठाच्या सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थिनीनं दीक्षांत सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या निषेधार्थ कार्थिका बी. कुरूप ही विद्यार्थिनी दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी कार्थिकाचा गौरव होणार होता. एम. एस्सी इलेक्ट्रॉनिक मीडिया या विषयात कार्थिकाला सुवर्ण पदक घोषित झालं आहे.
संसदेनं संमत केलेला सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा निषेध म्हणून दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय कार्थितानं घेतला आहे. शनिवारी तिनं तिचा हा निर्णय व्हॉट्स अॅप स्टेटसवर ठेवला होता. यानंतर अवघ्या काही तासांतच तो व्हायरल झाला. गेल्या वर्षी मास्टर्स पूर्ण केलेल्या कार्थिकाला सुवर्ण पदक जाहीर झालेलं आहे. 'राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मानवतेच्या आणि घटनेच्या विरोधात असलेल्या कायद्याचा निषेध करण्याचा मला हक्क आहे. मी लोकशाहीच्या मार्गानं माझा निषेध नोंदवत आहे', अशा शब्दांत कार्थिकानं तिची भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनांची दखल न घेणाऱ्या सरकारबद्दल कार्थिकानं नाराजी व्यक्त केली. 'देशभरात निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची बाजू ऐकून घेण्याची तयारी सरकारनं दाखवलेली नाही. जोपर्यंत सरकार हा कायदा मागे घेणार नाही, तोपर्यंत मी पदवी स्वीकारणार नाही,' अशी ठाम भूमिका कार्थिकानं घेतली आहे.
दीक्षांत सोहळ्यावर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बहिष्कार घालण्याचं आवाहन पुद्दुचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या ए. एस. अरुण कुमारनंदेखील दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचा आणि त्या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडू पाहणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं कुमारनं सांगितलं.