CAA Protest: आंदोलनात सहभाग घेतल्यानं जर्मन विद्यार्थ्याला सोडावा लागला भारत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 04:10 PM2019-12-24T16:10:50+5:302019-12-24T16:12:40+5:30
आयआयटी मद्रासमध्ये शिकणारा विद्यार्थी मायदेशी परतला
चेन्नई: सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केल्याबद्दल जर्मनीच्या विद्यार्थ्याला देश सोडावं लागल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयआयटी मद्रासमध्ये शिकणारा जेकब लिंडेंथल काल संध्याकाळी जर्मनीला परतला. जेकब आयआयटी मद्रासमध्ये भौतिकशास्ज्ञात एमएसस्सी करत होता. त्याची एक सेमिस्टर शिल्लक होती. मे २०२० मध्ये तो मायदेशी परतणार होता. मात्र सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केल्यानं त्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले.
गेल्या आठवड्यात चेन्नईत विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं केलं. त्यामध्ये जेकबनं सहभाग घेतला. मोदी सरकारनं संसदेत मंजूर केलेला नवा कायदा नाझींकडून ज्यूंवर केलेल्या अत्याचारांची आठवण करुन देणारा असल्याचे फलक यावेळी विद्यार्थ्यांनी दाखवले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात जेकब नव्या कायद्याविरोधात आंदोलन करताना दिसत होता.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केल्यामुळेच आपल्याला भारत सोडावा लागत असल्याचं जेकबनं माध्यमांना सांगितलं. मला सगळ्या गोष्टी तोंडी सांगण्यात आल्या, असं म्हणत आपल्याला कागदोपत्री कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत याकडे त्यानं लक्ष वेधलं. एखादा परदेशी नागरिक राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यास ते व्हिसा नियमांचं उल्लंघन ठरतं असं इमिग्रेशन विभागातील सूत्रांनी सांगितलं.