धक्कादायक ! टॅक्सी चालकाकडून महिला न्यायाधीशाच्या अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांनी चालकाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:05 PM2017-11-28T12:05:40+5:302017-11-28T12:51:54+5:30
दिल्लीतील गाजीपूर येथे एका टॅक्सी चालकानं महिला न्यायाधीशाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील गाजीपूर येथे एका टॅक्सी चालकानं महिला न्यायाधीशाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळावर वेळीच पोलीस पोहोचल्यानं ही घटना सुदैवानं टळली. महिला न्यायाधीश सोमवारी (27 नोव्हेंबर) टॅक्सीतून मध्य दिल्लीतील कडकडडूमा कोर्टाच्या दिशेनं प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे. आरोपी टॅक्सी चालकाचे नाव राजीव कुमार असे असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,कडकडडूमा कोर्टातील एका महिला न्यायाधीशानं मध्य दिल्लीतील आपल्या घरापासून कोर्ट गाठण्यासाठी टॅक्सी केली. मात्र टॅक्सी चालकानं हापूडच्या दिशेनं टॅक्सी वळवली. टॅक्सी चालकानं भलतीकडेच वळण घेतलेले पाहता महिला न्यायाधीशाच्या मनात संशय निर्माण झाला. यानंतर त्यांनी पुन्हा टॅक्सी चालकाला कडकडडूमा कोर्टाकडे नेण्यास सांगितले, मात्र टॅक्सी चालकानं महिला न्यायाधीशाचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले.
टॅक्सी चालकाचं वागणं संशयास्पद वाटल्यानं महिला न्यायाधीशानं तातडीनं पोलिसांना संपर्क साधत त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. यानंतर पोलिसांनी गाजीपूरजवळ टॅक्सी चालकाला अडवलं व त्याला ताब्यात घेतले. टॅक्सी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर महिला न्यायाधीशाला सुखरुपरित्या घरी पोहोचवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टॅक्सी चालक राजीव कुमार हा दिल्लीतील शाहदरा येथील राहणारा आहे. दरम्यान, या घटनेनंतर दिल्ली हायकोर्टाच्या कार्यकारी चीफ जस्टिस गीता मित्तल यांनी महिला न्यायाधीशांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
#Delhi Police has arrested a cab driver who allegedly attempted to abduct a lady judge. More details awaited.
— ANI (@ANI) November 28, 2017