कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:12 AM2019-05-29T04:12:34+5:302019-05-29T04:13:05+5:30
कर्नाटकातील आघाडी सरकार वाचविण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.
बंगळुरू : कर्नाटकातील आघाडी सरकार वाचविण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. जनता दल व कॉँग्रेस यांच्यातील समन्वयक सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळात तीन जणांना स्थान दिले जाईल, असे सांगतानाच, त्या जागा रिकाम्या होत्या. त्यामुळे हा विस्तार नाही, असा दावा केला.
फेरबदल होणार नाही, हा मंत्रिमंडळ विस्तार आहे. तीन जागा रिकाम्या आहेत. त्या भरल्या जाणार आहेत, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. असंतुष्ट आमदारांना जागा करून देण्यासाठी व सरकार स्थिर ठेवण्यासाठी तीन मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता आपणास हे माहीत नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.
राज्यातील सत्ताधारी आघाडीचा लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाला. त्यानंतर कर्नाटक मंत्रिमंडळाची शुक्रवारी तातडीची बैठक घेण्यात आली. त्या वेळीच मंत्रिमंडळातील फेरबदलांचा मुद्दा चर्चेत आला. हीच चर्चा कॉँग्रेसच्या आमदारांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)