जयललितांचे छायाचित्र ठेवून मंत्रिमंडळ बैठक
By Admin | Published: October 20, 2016 04:47 AM2016-10-20T04:47:15+5:302016-10-20T04:47:15+5:30
जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
चेन्नई : आजारी मुख्यमंत्री जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयललितांच्या अनुपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने या बैठकीची छायाचित्रे प्रसिद्धीला दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जयललिता यांचे छायाचित्र ठेवल्याचे आणि पनीरसेल्वम शेजारच्या खुर्चीवर विराजमान असल्याचे दिसते.
सरकारने बैठकीची कार्यक्रमपत्रिकेचे विवरण दिले नाही. तथापि, मंत्रिमंडळाने कावेरी जल वाटपासह इतर मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. ईशान्य मान्सून सुरू होण्यापूर्वी ही बैठक झाली. ईशान्य मान्सून या महिनाअखेरीस सुरू होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईशान्य मान्सूनने तामिळनाडूत प्रचंड विध्वंस घडवून आणला होता. चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री जयललिता मंत्रालयात परतेपर्यंत गृहमंत्रालयासह त्यांच्याकडील विभाग पनीरसेल्वम यांच्याकडे सोपविले होते. जयललिता गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात आहेत. ताप व निर्जलीकरणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.