२०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 06:39 AM2024-03-04T06:39:21+5:302024-03-04T06:39:55+5:30
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘विकसित भारत : २०४७’ साठी आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) आणि पुढील पाच वर्षांच्या विस्तृत कृती आराखड्यावर दिवसभर विचारमंथन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते.
सरकारी सूत्रांनी सांगितले की, मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ पावले उचलण्यासाठी १०० दिवसांची विषयपत्रिका (अजेंडा) त्वरित अमलात आणण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. ‘विकसित भारत’साठीचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ दोन वर्षांपेक्षा जास्त गहन तयारीतून साकारले असून, त्यात सर्व मंत्रालयांचा दृष्टिकोन आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, उद्योगसंस्था, नागरी समाज, वैज्ञानिकांचा व्यापक सल्ला समाविष्ट आहे. त्यासाठी विविध स्तरांवर २७०० हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. २० लाखांहून अधिक तरुणांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विकासाची ‘ब्लू प्रिंट’
‘विकसित भारत’ आराखडा राष्ट्रीय धोरण, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृती बिंदूंसह सर्वसमावेशक ‘ब्लू प्रिंट’ आहे, सूत्रांनी सांगितले. त्याच्या उद्दिष्टांमध्ये आर्थिक वाढ, शाश्वत विकास उद्दिष्टे, राहणीमान सुलभता, व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण सुलभ करणे यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या बैठकीत अनेक मंत्रालयांनी आपली कल्पना मांडली.
जनतेचा पाठिंबा मिळवा : मोदी
- पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्री सहकाऱ्यांना निवडणुकीदरम्यान लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगितले.
- विकासाला चालना देण्यासाठी आणि समाजाच्या सर्व घटकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारने केलेल्या असंख्य
उपाययोजनांबद्दलही मोदींनी सांगितले.
- बैठकीत विविध मुद्द्यांवर सादरीकरणही करण्यात आले. आपले सरकार सलग तिसऱ्यांदा सत्ता राखेल, असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला आहे.