गुजरात दंगलीत मोदींना लक्ष्य करणारे झाले कॅबिनेट मंत्री
By admin | Published: July 5, 2016 08:58 PM2016-07-05T20:58:48+5:302016-07-05T21:01:34+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोदींनी अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोदींनी अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एमजे अकबर यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. अकबर यांनी गुजरात दंगलीच्या वेळी मोदींवर टीका केली होती. तरीही मोदींनी त्यांना मंत्रिपद बहाल केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
एमजे अकबर हे 1989मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांमधले होते. काँग्रेसकडूनच त्यांना पहिली खासदारकी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशमधून 65 वर्षीय अकबर हे भाजपाकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. अकबर हे भाजपामधला स्पष्टवक्ते नेता आणि आधुनिक मुस्लिम चेहरा समजला जातो. त्यांनीच मोदींच्या विकासाच्या माध्यमातून हिंदुत्व हा मुद्दा दूर नेला. त्यामुळे पक्षाची बाजू मांडण्यासाठी भाजप त्यांना नेहमीच पुढे करते.
भाजपाच्या प्रवक्त्याच्या रुपात त्यांनी अनेकदा सरकारच्या परराष्ट्र धोरणावर चर्चाही केली आहे. त्यांनी वृत्तपत्राचं संपादकपदही भूषवलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनावर त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. 1980च्या दशकात राजीव गांधींच्या जवळ गेल्यानं त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तसेच 1989मध्ये बिहारच्या किशनगंजमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. मात्र त्या वर्षी काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. 1991मध्ये गांधी हत्येनंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते पत्रकारितेत सक्रिय झाले. 2002ला गुजरात दंगलीच्या वेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली होती. मात्र त्यानंतर ते भाजपाच्या जवळ आले. अकबर हे इंग्रजी बोलण्यात निष्णात आहेत. त्यामुळे ते एका मुस्लिम नेत्यांची कमी भरून काढतील, अशी भाजपाला आशा आहे.