ना राज्यवर्धन राठोड, ना गौतम गंभीर; नरेंद्र मोदींनी निवडला नवा क्रीडा मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:13 PM2019-05-31T15:13:37+5:302019-05-31T15:14:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह 58 मंत्रीपद शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह 58 मंत्रीपद शुक्रवारी जाहीर करण्यात आली. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि ऑलिम्पिक पदकविजेता नेमबाज राज्यवर्धन राठोड यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने केंद्रीय क्रीडा मंत्रीपदी या दोघांपैकी एकाची वर्णी लागेल अशी सर्वांना अपेक्षा होती. राठोड यांनी मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये क्रीडा मंत्रीपद भूषविल्याने यंदा खांदेपालट म्हणून हे खाते गंभीरकडे दिले जाईल, असा कयास बांधला जात होता. पण, मोदींनी अनपेक्षित धक्का देत पूर्वांचलच्या किरण रिजिजू यांच्याकडे क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.
अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या रिजिजू यांना राज्य मंत्रीपदावरून थेट क्रीडा मंत्री म्हणून प्रमोशन देण्यात आले. रिजिजू यांना राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार देण्याबरोबरच युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. 2020मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर रिजिजू यांना देण्यात आलेले मंत्रीपद हे काटेरी मुकुट असल्याचे बोलले जात आहे. माजी क्रीडा मंत्री राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप चांगले काम केले आहे. त्यांनी खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळवून दिल्या आणि त्याचा सकारात्मक निकालही पाहायला मिळाला होता.
2011च्या वर्ल्ड कप विजयात गंभीरची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. त्याला पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने 6 लाख 96 हजार 156 मतांसह विजय मिळवला आहे. त्याच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या अरवींद सिंग लवली यांनी 3 लाख 04 हजार 934 मतं मिळवली, तर आम आदमी पार्टीच्या आतिषी यांना 2 लाख 19 हजार 328 मतं मिळाली.
राजस्थानमधील जयपूर ग्रामीण मतदारसंघात दोन ऑलिम्पिकपटूंमध्ये स्पर्धा होती. सध्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री आणि 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता नेमबाज राज्यवर्धन राठोड याच्यासमोर काँग्रेसच्या तिकीटावर उभी असलेली कृष्णा पुनियाने आव्हान उभे केले होते. राठोड यांनी 8 लाख 20 हजार 132 मतांसह मोठा विजय मिळवला आहे, पुनियाला 4 लाख 26 हजार 961 मतं मिळवता आली.