Cabinet Reshuffle : केंद्रातील मंत्रिमंडळ जम्बो आणि प्रश्नही आहेत जम्बो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:36 AM2021-07-12T09:36:46+5:302021-07-12T09:40:20+5:30
PM Narendra Modi Cabinet Reshuffle : बऱ्याच राज्यमंत्र्यांना रूमही नाही, सहा जणांकडे अनेक खाती.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात केलेले फार मोठे बदल, त्यातील ४५ राज्यमंत्री आणि आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे गोव्याचे यसोपाद नाईक यांच्यासह अनेकांची झालेली पदावनती आणि १२ जणांना दिलेला निरोप खळबळ निर्माण करणारा ठरला आहे. मोदींच्या जम्बो मंत्रिमंडळासमोर प्रश्नही जम्बो आहेत.
संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हाद पटेल यांची पदावनती करून त्यांना दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली असलेले जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया जबाबदारी दिली गेली आहे. विशेष म्हणजे गजेंद्र शेखावत यांच्याकडे असलेल्या छोट्याशा जलशक्ती मंत्रालयाला पटेल आणि बिशेश्वर टुटू हे दोन राज्यमंत्री आहेत. संस्कृती आणि पर्यटनासारख्या छोट्या मंत्रालयाचा अर्थसंकल्प ४,७०० कोटी रुपयांपेक्षाही कमी आहे तरी त्याला एक कॅबिनेट व चार राज्यमंत्री आहेत. गृह, अर्थ, रेल्वे किंवा परराष्ट्र मंत्रालयासह कोणत्याही मंत्रालयाला चार राज्यमंत्री नाहीत.
सहा जणांकडे अनेक खाती
राज्यमंत्री (कंपनी कामकाज) राव इंदरजित सिंह यांना मंत्रालयात बसण्यासाठी जागा नाही. त्यांना अजून पदाची सूत्रे घ्यायची आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी कामाचे वाटप करणारा आदेश काढलेला नाही. ७८ सदस्यांच्या सहा कॅबिनेट मंत्र्यांकडे (पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद पटेल, सर्बानंद सोनोवाल, अश्विनी बैष्णव आणि मनसुख मांडविया) अनेक खात्यांची जबाबदारी आहे.