केंद्रीय मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांचा राजीनामा
By Admin | Published: July 5, 2016 12:57 PM2016-07-05T12:57:50+5:302016-07-05T12:57:50+5:30
केंद्रीय मत्रिमंडळ विस्तारात एकीकडे 19 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे 5 मंत्र्यांची गच्छंती झाली असून त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला आहे
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 05 - केंद्रीय मत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार झाला असून मंत्रिमंडळात 19 नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारात दहा राज्यातून 19 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे 5 मंत्र्यांची गच्छंती झाली असून त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला आहे. राष्ट्रपती भवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी मंगळवारी सकाळी पार पार पडला. मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
5 मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सोपवला असून यामध्ये निहालचंद, राम शंकर कठेरिया, सांवर लाल जाट, मनसुखभाई डी वासवा आणि एम के कुंडारिया यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले शपथ घेताना नाव विसरल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. मोदींच्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांना प्रमोशन मिळालं आहे. जावडेकर यांची राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे.