कॅगला समजले भारतीय रेल्वेच्या विस्कटलेल्या गणिताचे गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:37 PM2018-08-09T16:37:22+5:302018-08-09T16:40:31+5:30
कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत.
नवी दिल्ली- भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षांमध्ये वेळापत्रकापेक्षा अत्यंत उशिरा धावत असल्याचे दिसत आहे.
2017-18 या वर्षी 30 टक्के ट्रेन उशिरा धावल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल 2017-मार्च 2018 या कालावधीमध्ये केवळ 71.39 टक्के फेऱ्याच वेळेवर झाल्या. त्याआधीच्या वर्षापेक्षा म्हणजे 2016-17 यावर्षी 76.69 टक्के इतक्याच फेऱ्या वेळेनुसार झाल्या होत्या. कॅगला मात्र भारतीय रेल्वेच्या 'मंदयाळीचे' कारण समजले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅगने भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या विविध गोंधळाच्या बाबी उजेडात येत आहेत. केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्थानकांच्या पुनर्विकास योजनेतील त्रूटींमुळे हा उशिर होत असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. या योजनेमुळे स्थानकांवर रेल्वे थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही व त्यामुळे वेळापत्रक कोलमडते.
कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत. 24 डब्यांच्या रेल्वे थांबतील अशी स्थानकांवर पुरेशा प्लॅटफॉर्म्सची सुविधा नाही तसेच वॉशिंग पिट लाइन्स आणि स्टॅबलिंग लाइन्स नसल्यामुळेही रेल्वेला उशिर होतो असे मत कॅगने नोंदवले आहे. कॅगने भारतीय रेल्वेच्या 10 विभागांपैकी 15 स्थानकांचा अभ्यास केला.
गेल्याच आठवड्यात याप्रकारेच आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली होती. 2014 साली पाठवलेले खत रेल्वेने संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही.