मृतांवर उपचार, एका नंबरवरून 10 लाख लोकांची नोंदणी; आयुष्मान भारत योजनेवर कॅगचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 03:15 PM2023-08-09T15:15:32+5:302023-08-09T15:16:33+5:30

देशातील गरजू नागरिकांना उपचार सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेत मोठा घोळ असल्याचं समोर आलं आहे. कॅगने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे

cag report on ayushman bharat yojna patients shown dead getting treatment lakhs of people registered on single number | मृतांवर उपचार, एका नंबरवरून 10 लाख लोकांची नोंदणी; आयुष्मान भारत योजनेवर कॅगचा खुलासा

फोटो - आजतक

googlenewsNext

देशातील गरजू नागरिकांना उपचार सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेत मोठा घोळ असल्याचं समोर आलं आहे. कॅगने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. या योजनेबाबत जारी केलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये कॅगने सांगितले आहे की, या योजनेंतर्गत असे रुग्णही लाभ घेत आहेत, ज्यांना यापूर्वी मृत दाखवण्यात आलं होतं. एवढंच नाही तर AB-PMJY योजनेचे 9 लाखांहून अधिक लाभार्थी हे एका मोबाईल क्रमांकाशी जोडलेले आढळले आहेत.

ज्यांना यापूर्वी 'मृत' दाखवण्यात आलं होतं अशा रुग्णांना योजनेंतर्गत उपचार मिळत असल्याचं समोर आलं आहे. TMS मधील मृत्यू प्रकरणांच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर असं दिसून आले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारादरम्यान 88,760 रुग्णांचा मृत्यू झाला. या रूग्णांच्या संदर्भात नवीन उपचारांशी संबंधित एकूण 2,14,923 दावे सिस्टीममध्ये सशुल्क म्हणून दाखवण्यात आले आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये वरील दाव्यांच्या जवळपास 3,903 प्रकरणांमध्ये दाव्याची रक्कम रुग्णालयांना देण्यात आली. त्यापैकी 3,446 रुग्णांशी संबंधित पेमेंट 6.97 कोटी रुपये होतं.

मृत व्यक्तींवर उपचाराचा दावा केल्याची सर्वाधिक प्रकरणे देशातील पाच राज्यांमध्ये दिसून आली आहेत. यामध्ये छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. कॅगच्या अहवालात असे नमूद केले आहे की राज्य आरोग्य संस्थांकडून (SHA) आवश्यक चाचण्यांची पडताळणी न करता अशा दाव्यांचे पेमेंट ही एक मोठी चूक आहे. आकडेवारीचे विश्लेषण केले असता, या योजनेचा एक लाभार्थी एकाच वेळी अनेक रुग्णालयात दाखल झाल्याचेही आढळून आले. जुलै 2020 मध्ये, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) देखील या समस्येवर प्रकाश टाकला होता.

NHA ने म्हटले होते की ही प्रकरणे अशा परिस्थितीत येतात जेव्हा एका रुग्णालयात बाळाचा जन्म होतो आणि आईच्या PMJAY आयडीचा वापर करून नवजात बालकांच्या काळजीसाठी दुसऱ्या रुग्णालयात स्थानांतरित केले जाते. परंतु कॅगच्या तपासणीत असे दिसून आले आहे की डेटाबेसमध्ये 48,387 रूग्णांचे 78,396 दावे आढळून आले आहेत, ज्यामध्ये या रूग्णांना पहिल्या उपचारांसाठी सोडण्याची तारीख त्याच रूग्णाच्या दुसर्‍या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या तारखेनंतर होती. अशा रुग्णांमध्ये 23,670 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आयुष्मान भारत योजनेबाबत कॅगच्या ऑडिट रिपोर्टमध्ये झालेला दुसरा मोठा खुलासा आश्चर्यकारक आहे. महालेखा परीक्षकांनी सांगितले आहे की या योजनेंतर्गत लाभ मिळवणारे लाखो लाभार्थी आहेत, ज्यांची मोबाईल क्रमांकावर नोंदणी आहे. विशेष म्हणजे या सरकारी योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे सर्वात महत्त्वाचे आहे. लाभार्थींनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच त्याची नोंद शोधली जाते.

साधारणपणे, एखाद्या लाभार्थीचा मोबाईल क्रमांक चुकीचा असल्यास किंवा ई-कार्ड हरवल्यास, लाभार्थी ओळखणे कठीण होते आणि नंतर योजनेत समाविष्ट असलेली रुग्णालये उपचार देण्यास नकार देतात. पण इथेच मोठा घोटाळा झाला आहे. लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणीमध्ये गंभीर अनियमितता समोर आल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की बीआयएस डेटाबेसच्या डेटाचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की एकाच मोबाईल नंबरवर अनेक लाभार्थ्यांची नोंदणी केली गेली आहे. तीन नंबरवर सुमारे 9.85 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. 9999999999 या मोबाईल क्रमांकावर PMJAY योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून 7.49 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. कॅगने केलेल्या तपासात असेही समोर आले आहे की या हेराफेरीसाठी वापरल्या जाणार्‍या इतर क्रमांकांमध्ये 8888888888, 9000000000, 20, 1435 आणि 185397 यांचा समावेश आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: cag report on ayushman bharat yojna patients shown dead getting treatment lakhs of people registered on single number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.