मनमोहनसिंग यांना न्यायालयात बोलवा
By Admin | Published: September 21, 2015 11:27 PM2015-09-21T23:27:47+5:302015-09-21T23:27:47+5:30
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयाने प्रकरणाची तपासणी आणि पुनर्तपासणी केल्यानंतरच जिंदल समूहाला कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता
नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयाने प्रकरणाची तपासणी आणि पुनर्तपासणी केल्यानंतरच जिंदल समूहाला कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी सोमवारी विशेष न्यायालयात केला. डॉ. मनमोहनसिंग यांना अतिरिक्त आरोपी म्हणून न्यायालयात बोलावण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेला आपला पाठिंबा आहे, असे राव यावेळी म्हणाले.
कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणात अतिरिक्त आरोपी म्हणून मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांनाही न्यायालयात बोलावण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी दाखल केली आहे. ‘झारखंडमधील मुर्गादंगल कोळसा खाणपट्टा नवीन जिंदल समूहाच्या कंपनीला वाटप करण्यात आला होता आणि त्यावेळी कोळसामंत्री असलेले मनमोहनसिंग यांनीच हा निर्णय घेतला होता’, असे या मागणीला पाठिंबा देताना राव यांच्या वकिलाने विशेष सीबीआय न्यायालयात सांगितले. ‘मी कोडा यांच्या मागणीचे समर्थन करीत आहे,’ असे राव यांच्या वतीने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले. तथापि या मागणीला आपला पाठिंबाही नाही आणि त्याचा विरोधही करीत नाही, असे उद्योगपती नवीन जिंदल यांची वकील एस.व्ही. राजू म्हणाले. या प्रकरणातील १५ आरोपींमध्ये कोडा यांचाही समावेश आहे. मनमोहनसिंग यांच्यासह तत्कालीन ऊर्जा सचिव आनंद स्वरूप आणि तत्कालीन खाण सचिव जयशंकर तिवारी यांनाही अतिरिक्त आरोपी म्हणून समन्स बजावण्याची मागणी कोडा यांनी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)