सरकारला रक्तपिपासू म्हणाले; माजी राज्यपालांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:48 AM2021-09-07T05:48:15+5:302021-09-07T05:48:45+5:30
उत्तर प्रदेश सरकारबाबत केले होते वक्तव्य
लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथांचे सरकार म्हणजे रक्तपिपासू राक्षस आहे, अशी टीका करणारे त्या राज्याचे माजी राज्यपाल व काँग्रेसचे नेते अझीझ कुरेशी यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
तुरुंगवास भोगत असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीची अझीझ कुरेशी यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते. भाजपचे नेते आकाशकुमार सक्सेना यांनी याप्रकरणी माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांच्या विरोधात रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला.
आकाशकुमार सक्सेना यांनी म्हटले आहे की, आझम खान यांची पत्नी तझीन फातमा यांच्याशी झालेल्या भेटीत माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांनी योगी आदित्यनाथ सरकारबद्दल अतिशय बदनामीकारक उद्गार काढले. अशा वक्तव्यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण होऊ शकते. अझीझ कुरेशी यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रसारण विविध वृत्तवाहिन्यांनी केले होते. त्याच्या चित्रफिती असलेला पेन ड्राईव्ह आकाशकुमार सक्सेना यांनी पुरावा म्हणून पोलिसांच्या हाती सुपूर्द केला आहे.